NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई! पुण्यातून मुख्य सुत्रधार शिक्षिका मनिषा मांधरेला सीबीआय कडून अटक

पुणे/नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (CBI) एक अत्यंत मोठे यश आले आहे. सीबीआयने या प्रकरणाची मुख्य सुत्रधार (Mastermind) आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ची तज्ज्ञ असलेल्या मनिषा गुरुनाथ मांधरे हिला पुण्यातून अटक केली आहे. मनिषा मांधरे ही पुण्यात वरिष्ठ वनस्पतिशास्त्र (Botany) शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

प्रश्नपत्रिकेपर्यंत होती थेट पोहोच; घरातच घेतले स्पेशल क्लासेस: सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिषा मांधरे हिची राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे तिला नीट परीक्षेच्या वनस्पतिशास्त्र (Botany) आणि प्राणिशास्त्र (Zoology) या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये थेट प्रवेश (Access) मिळाला होता. याचाच गैरफायदा घेत तिने १४ मे रोजी अटक करण्यात आलेली अन्य आरोपी मनिषा वाघमारे हिच्या मदतीने परीक्षेतील संभाव्य उमेदवारांना (विद्यार्थ्यांना) एकत्र केले होते. यानंतर मनिषा मांधरे हिने आपल्या पुण्याच्या निवासस्थानी या विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेऊन त्यांना लीक झालेल्या प्रश्नांची तयारी करून घेतल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

देशभरातून ९ जणांना बेड्या, ६ ठिकाणी छापे: नीट पेपर फुटीच्या या रॅकेटप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथून एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. यापैकी ५ आरोपींना यापूर्वीच न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर काल अटक करण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींना पुण्याच्या न्यायालयात हजर करून ‘ट्रान्झिट रिमांड’ अंतर्गत दिल्लीला हलवण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात ६ वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार छापे टाकले आहेत. या कारवाई दरम्यान सीबीआयने अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप, संशयितांचे बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन्स जप्त केले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *