[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
World Cup 2023 Points Table : धरमशालाच्या मैदानावर नेदरलँडने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव करत यंदाच्या विश्वचषकातील दुसरा मोठा उलटफेर केला. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तान संगाने गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला होता. आज दक्षिण आफ्रिकेला दुबळ्या नेदरलँडने पराभवाचा धक्का दिला आहे. नेदरलँडच्या विजयाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. नेदरलँडच्या विजयामुळे टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघांचा अद्याप एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. तर श्रीलंकेला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही.
नेदरलँडविरोधात दक्षिण आफ्रिका मोठ्या फरकाने जिंकणार, असाच सर्वांचा अंदाज होता. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडचा पराभव केला असता, तर ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाले असते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा रनरेट +2 पेक्षा जास्त होता. चार गुणांसह दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. तर भारतीय संघ सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पण दक्षिण आफ्रिकेन आजचा सामना जिंकला असता तर सहा गुणांसह ते पहिल्या स्थानावर पोहचले असते. कारण, भारतापेक्षा त्यांचा रनरेट तगडा होता. आता भारत आणि न्यूझीलंड यांचे पहिले आणि दुसरे स्थान कायम आहे.
गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर –
पाकिस्तानचा पराभव करत शनिवारी भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला. भारतीय संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. पण भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे भारत टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला.
श्रीलंका तळाला –
रविवारी अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान संघाने गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. अफगाणिस्तान संघाने साहेबांचा पराभव करत गुणतालिकेत मोठा फेरबदल केला होता. साहेबांचा पराभव करत अफगाणिस्तान संघाने दहाव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंडचा संघ तीन सामन्यात दोन पराभवासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. बांगलादेशचा संघ तीन सामन्यात दोन गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन गुणांसह आठव्या तर नेदरलँडचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. विश्वचषक विजेत्या श्रीलंकेला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेचा संघ शून्य गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
[ad_2]