भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन   

नवी दिल्ली :(pragatbharat.com) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशातील खुल्या आर्थिक धोरणाचे ते शिल्पकार मानले जातात. पी.व्ही नरसिंह राव यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून काम करतांना देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी नवे आणि निर्णायक वळण दिले. शांत आणि मितभाषी स्वभाव, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थामुळे सक्रीय राजकारणापासून दूर होते. १९९१ मध्ये देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना अर्थमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण – उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग स्विकारला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. २००४ साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठले, त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले. २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. 

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सह विविध पक्षाच्या नेत्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली वाहिली.      

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी आता पाकिस्तामध्ये असलेल्या पश्चिम पंजाबमधील गाहमध्ये झाला. त्यांनी अनुक्रमे १९५२ आणि १९५४ मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 

१९५७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९६२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी. फिल केले. १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.

१९६६ ते १९६९ या काळात डॉ.सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केले. नंतरच्या काळात अर्थ मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केले. १९७२ ते १९७६ या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली.  १९८२ ते १९८५ या काळात त्यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले. १९८५ ते १९८७ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. यूएनसीटीडी सचिवालयात दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. याशिवाय डॉ. सिंग यांनी अर्थ मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली. १९९१ पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. १९९१ मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. 

१९९८-२००४ पर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले.  २००४ ते २०१४ या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले. एप्रिल २०२४ साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. 

मिळालेले पुरस्कार 

डॉ. सिंग यांना १९८७ मध्ये भारत सरकारकडून पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणार्‍या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. १९९३ मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, १९९३ आणि १९९४ या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार, १९९५ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    

डॉ. मनमोहन सिंग यांचे पाच मोठे निर्णय

१) जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण धोरण

२) रोजगार हमी योजना

३) आधार कार्ड  

४) भारत-अमेरिका आण्विक करार 

५) शिक्षण अधिकार कायदा 

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

– मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस 

डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केले. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली.  भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचे मोठे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचे सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपले आहे. 

– उपमुख्यमंत्री, अजित पवार 

डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री आणि पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली. अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली. साध्या सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणार्‍या मनमोहन सिंग यांनी एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे.

– उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

Related posts