
कुर्डुवाडी/पुणे (pragatbharat.com) : सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एक थरारक आणि तितकाच भावनिक प्रसंग घडला. मुलीसाठी बिस्किटे आणण्यासाठी कुर्डुवाडी स्थानकावर उतरलेल्या वडिलांना ट्रेन पकडता आली नाही आणि त्यांची तीन वर्षांची चिमुकली धावत्या ट्रेनमध्ये एकटीच राहिली. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्कतेमुळे आणि ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’च्या तत्परतेमुळे या मुलीची तिच्या पालकांशी सुखरूप भेट घडली आहे.
ही घटना २ मे रोजी घडली. राहुल खुरमुटे हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह प्रवास करत होते. गाडी कुर्डुवाडी स्थानकात थांबली असता, मुलीला भूक लागल्याने राहुल हे बिस्किटे आणण्यासाठी खाली उतरले. मात्र, वंदे भारतचा थांबा कमी वेळेचा असल्याने ते परत येण्यापूर्वीच ट्रेन सुटली. आपली मुलगी डब्यात एकटीच राहिल्याचे लक्षात येताच राहुल यांची मोठी धावपळ उडाली. दरम्यान, सी-५ कोचमधील सीट क्रमांक ३० वर एकटी रडणारी मुलगी पाहून प्रवाशांनी तात्काळ टीटीई एच. एल. मीना यांना माहिती दिली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली. आरपीएफचे जवान विनय प्रकाश आणि एएसआय एन. एन. नलावडे यांनी मुलीची जबाबदारी स्वीकारली. रेल्वेच्या आरक्षण तपशीलावरून वडिलांचा क्रमांक शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. वडिलांना पुढील गाडीने पुणे गाठण्यास सांगण्यात आले. संपूर्ण प्रवासात एका महिला प्रवाशाने आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुलीला सांभाळले. अखेर पुणे रेल्वे स्थानकावर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.


