नवी मुंबई APMC मार्केटमध्ये FDA ची मोठी धाड; आंबे पिकवण्यासाठी घातक केमिकलचा वापर? नमुने जप्त

नवी मुंबई (pragatbharat.com) : उन्हाळ्याचा हंगाम सुरू असतानाच नवी मुंबईतील एपीएमसी (APMC) फळ बाजारातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारीनंतर, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. या धाडसत्रामुळे फळ बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका जागरूक ग्राहकाने काही व्यापारी आंब्यांवर संशयास्पद रसायनांची फवारणी करत असल्याचे पाहिले होते. या माहितीच्या आधारे प्रशासनाने तात्काळ ‘ॲक्शन मोड’मध्ये येत संबंधित गाळ्यांवर छापे टाकले. यावेळी अनेक संशयास्पद आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आंबे लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड किंवा इतर प्रतिबंधित औषधांचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

केमिकल वापरून पिकवलेले आंबे खाल्ल्याने मानवी शरीरावर, विशेषतः पचनसंस्थेवर आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. “आम्ही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत, त्याचा अहवाल आल्यानंतर दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली जाईल,” असे एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये “आपण खातोय तो आंबा नैसर्गिक आहे की केमिकलचा?” असा भीतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *