अवघ्या ५०० रुपयांसाठी तरुणाची हत्या; इन्स्टाग्रामवर ‘टपका रे टपका’ रील पोस्ट करणे आरोपींना पडले महाग, पोलीस गजाआड

छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : जिल्ह्यातील विटावा शिवार परिसरात घडलेल्या एका अज्ञात तरुणाच्या थरारक आणि गुंतागुंतीच्या खुनाचा छडा लावण्यात एमआयडीसी वाळूज पोलीस आणि सायबर सेलला मोठे यश आले आहे. हत्येनंतर इन्स्टाग्रामवर (Instagram) “टपका रे टपका” या गाण्यावर रील आणि स्टोरी पोस्ट करणे आरोपींना भलतेच महागात पडले. या सोशल मीडिया रीलचा धागा पकडत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या ५०० रुपयांच्या किरकोळ आर्थिक वादातून हा क्रूर खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

धारदार शस्त्राने केला वार; गुन्हेगारी पार्श्वभूमी या हत्याकांडात ओंकार चंद्रकांत सूर्यवंशी (वय २२, रा. रामनगर सांगवी, नांदेड) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्परतेने कारवाई करत रवी देविदास दुधमल (वय १९, रा. नांदेड), सय्यद हाशिम सय्यद हसन (वय १८, रा. रांजणगाव शेणपुंजी, गंगापूर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मृत ओंकार आणि त्याला संपवणारे आरोपी हे सगळेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एक आरोपी तर आधीच जेलमधून पसार होऊन येथे गुन्हेगारी कृत्य करत होता.

इन्स्टा रील बनली पोलिसांसाठी ‘दुवा’ ही घटना १४ मे रोजी मध्यरात्री विटावा शिवार परिसरात घडली होती. सुरुवातीला मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, १८ मे रोजी संशय बळावल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोस्टमार्टम (Post Mortem) अहवालात ओंकारवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये एक संशयित दुचाकी दिसली. याच दरम्यान सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत, हत्येनंतर आरोपींनी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या रीलवरून त्यांची अचूक ओळख पटवली.

भाजी विक्रेते बनून पोलिसांनी रचला सापळा आरोपी नांदेड परिसरात लपल्याची माहिती मिळताच वाळूज पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. आरोपींना संशय येऊ नये म्हणून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क भाजी विक्रेत्याचा वेश परिधान केला होता. सलग ३ ते ४ दिवस पाळत ठेवून पोलिसांनी माहिती काढली. आरोपी परराज्यात पळून गेले होते, मात्र ते पुन्हा परिसरात परतत असल्याची अचूक टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही अटक केली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी ५०० रुपयांच्या देवाणघेवाणीच्या वादातून ओंकारचा खून केल्याची कबुली दिली.

पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावणाऱ्या तपास पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *