
पिंपरी (pragatbharat.com) : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी ८ नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बंदी असलेली बेकायदेशीर हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा थेट आणि गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र घबराट, शोककळा आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दोन नागरिकांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात मृत्यूशी झुंज धक्कादायक बाब म्हणजे, या परिसरातील आणखी दोघांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. सध्या सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये आणि अक्षय अवसरमल यांच्यावर पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (YCM) उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून ते सध्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.
मृत पावलेल्या नागरिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) पांडुरंग फुगे, २) विजय प्रकाश राठोड, ३) राजेंद्र प्रकाश राठोड, ४) राजू राजपूत, ५) अकबर पठाण, ६) बाबा शेख, ७) आनंद देसाई, ८) आनंद निकाळजे.
पोलिसांचा विषारी दारूचा इन्कार, मात्र चक्रावणारा दावा स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांकडून विषारी दारूचा उघड आरोप केला जात असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र प्राथमिक स्तरावर हा दावा फेटाळला आहे. ८ पैकी ५ नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या नैसर्गिक कारणांनी आणि आजाराने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांच्याच दाव्यानुसार, मृत पावलेल्या ८ पैकी ५ व्यक्तींना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती. एकाच परिसरातील आठ लोकांना एकाच दिवशी तीव्र चक्कर येऊन मृत्यू झाल्यामुळे पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राजकीय वातावरण तापले; माजी महापौरांचा पोलिसांवर संताप या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. “परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असताना पोलीस प्रशासन डोळे मिटून का बसले होते? पोलीस कधी जागे होणार?” असा रोकडा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.
सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन (Post Mortem) करण्यात येत असून, अधिकृत वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण ‘विषारी दारू’ की ‘अन्य काही’ हे स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



