
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत संघर्ष आणि नाराजी आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली वर्णी लागावी यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली आणि लॉबिंग सुरू केल्याची विश्वासार्ह माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, आपले पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी छगन भुजबळ आग्रही असल्याचे समजते.
‘इतर नेत्यांची मुलं-मुली चालतात, मग आम्हीच का नाही?’ भुजबळ समर्थकांचा रोखठोक सवाल छगन भुजबळ हे स्वतः राज्यसभेवर गेल्यास आणि त्यांच्या पुतण्याला राज्यात मंत्री केल्यास पक्षावर ‘राजकीय घराणेशाहीचा’ आरोप होऊ शकतो, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. यावर छगन भुजबळ यांच्या एका कट्टर समर्थकाने नाव न छापण्याच्या अटीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर अत्यंत गंभीर आणि रोकडा सवाल उपस्थित केला आहे. त्या समर्थकाने म्हटले आहे की, “राज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना खासदार करण्यात आले. सुनील तटकरे खासदार असूनही त्यांच्या मुलीला (अदिती तटकरे) राज्यात कॅबिनेट मंत्री केले गेले. आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार दिल्लीत खासदार आहेत; मग हाच घराणेशाहीचा नियम इतरांना का लागू केला जात नाही?” समर्थकांच्या या भूमिकेमुळे पक्षात मोठा पेच निर्माण झाला आहे.
अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर छगन भुजबळ हे सध्या राज्य सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून अजित पवार आणि भुजबळ यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात ओबीसींचे नेते म्हणून छगन भुजबळ यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेवर अजित पवार यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत उघड नाराजी व्यक्त केली होती. “काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होते आणि पक्षाला मोठी राजकीय किंमत मोजावी लागते,” अशा शब्दांत अजित पवारांनी भुजबळांचे नाव न घेता सुनावले होते.
राज्यसभेच्या जागेवर कोणाची लागणार वर्णी? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क आहे. मात्र, पक्षनेतृत्व छगन भुजबळ यांच्या नावाला संमती देणार की ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद टाळण्यासाठी दुसऱ्या एखाद्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अंतर्गत संघर्षामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणखी रुंदावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.


