उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; कल्याणजवळ वादळात अडकले, मोठा अनर्थ टळला

मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका भीषण हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी (७ मे २०२६) दुपारी ते एका खाजगी लग्नसमारंभासाठी मुरबाडकडे जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला कल्याण परिसरातील भीषण वादळाचा तडाखा बसला. मात्र, वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, हेलिकॉप्टरचे मुंबईतील जुहू विमानतळावर यशस्वी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी ३:३० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे आपल्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबातील लग्नासाठी रवाना झाले होते. त्यांचे हेलिकॉप्टर नवी मुंबईतील ऐरोली आणि कल्याणच्या दरम्यान पोहोचले असता, अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळामुळे (Dust Storm) हवेतील दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी झाली.

हेलिकॉप्टर वादळात अडकल्याचे लक्षात येताच, वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुढील प्रवास करणे धोक्याचे असल्याचे एकनाथ शिंदे यांना कळवले. शिंदे यांनी तात्काळ संमती दिल्यानंतर, वैमानिकाने हेलिकॉप्टर सुरक्षितपणे माघारी वळवले. साधारण १० ते १५ मिनिटे हेलिकॉप्टर वादळाच्या तडाख्यात होते, ज्यामुळे विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. अखेर पवन हंसच्या जुहू हेलिपॅडवर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रुडकर आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. यशस्वी लँडिंगनंतर शिंदे आपल्या निवास्थानाकडे रवाना झाले. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सर्व सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *