कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान; लिपुलेख आणि नथू ला खिंडीतून जाणार १०-१० तुकड्या, १९ मे पर्यंत करा अर्ज

नवी दिल्ली (pragatbharat.com) : भगवान शिवशंकराचे निवासस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला यंदा जून महिन्यापासून सुरुवात होत आहे. ही यात्रा ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार असून, परराष्ट्र मंत्रालयाने यात्रेचे सविस्तर नियोजन जाहीर केले आहे. यंदा या यात्रेसाठी दोन वेगवेगळ्या मार्गांवरून प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या १० तुकड्या पाठवण्यात येणार आहेत.

यात्रेचे मार्ग आणि नियोजन: परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंच्या १० तुकड्या उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून मार्गक्रमण करतील. तर उर्वरित १० तुकड्या सिक्किममधील नथू ला खिंडीतून कैलास मानसरोवराकडे रवाना होतील. ही संपूर्ण यात्रा भारत आणि चीन सरकारच्या परस्पर समन्वयाने आयोजित केली जाते. यात्रेकरूंची निवड ही पूर्णपणे संगणकीय, पारदर्शक आणि लिंग-समानता राखून ‘रँडम’ पद्धतीने केली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची तारीख: इच्छुक भाविकांसाठी kmy.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ खुले करण्यात आले आहे. यात्रेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ मे २०२६ आहे. अर्जदारांनी पत्राद्वारे किंवा फॅक्सद्वारे माहिती न मागवता, संकेतस्थळावरील ‘फीडबॅक’ पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करताना भाविक आपल्या पसंतीनुसार दोन्ही किंवा एका मार्गाची निवड करू शकतात. ऑनलाइन अर्जापासून ते निवडीपर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *