
चंद्रपूर (pragatbharat.com) : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात १ जुलै २०१७ पासून लागू केलेल्या ‘एक देश, एक कर’ म्हणजेच वस्तू व सेवा कर (GST) या सुलभ करप्रणालीमुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळत आहे. चंद्रपूर जिल्हा हा उद्योग आणि वनसंपदेने नटलेला आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा असून, देशाच्या विकासात या जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे. चंद्रपूर येथे वस्तू व सेवा कर विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे (जीएसटी भवन) अधिकृत लोकार्पण करताना ते बोलत होते.
या ऐतिहासिक सोहळ्याला वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, चंद्रपूरच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे चंद्रपूर शहरात ही अत्याधुनिक आणि भव्य इमारत साकार झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
१४५० कोटींचा महसूल; लक्षांक पूर्ततेत चंद्रपूर राज्यात दुसरा : प्रास्ताविकात राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी इमारतीविषयी सविस्तर माहिती दिली. ही नूतन इमारत चार मजली असून, याच्या उत्कृष्ट बांधकामासाठी एकूण २९ कोटी ९९ लक्ष ८० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे भवन चंद्रपूर विभागाचे मुख्य मुख्यालय असणार असून, या अंतर्गत चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हे तीन जिल्हे येणार आहेत. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत चंद्रपूर विभागाने तब्बल १४५० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा केला आहे. दिलेल्या लक्षांकाच्या १२२ टक्के कामगिरी करत चंद्रपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात द्वितीय (दुसरा) क्रमांक पटकावला आहे.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित भारत – २०४७’ चा जो रोडमॅप तयार केला आहे, त्यात महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे असेल. गडचिरोली जिल्ह्याचा आर्थिक विकास करून त्याला राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांत आणण्याचा सरकारचा संकल्प आहे. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले आणि फित कापून इमारतीची पाहणी करण्यात आली.


