
मुंबई (pragatbharat.com) : सोन्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या जव्हेरी बाजारातील दोन व्यापाऱ्यांना स्वस्त दरात शुद्ध सोने देण्याचे आमिष दाखवून ३० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा एल.टी. मार्ग (LT Marg) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार मुस्तफा शेख ऊर्फ सूरज याच्यासह चौघांना अटक केली आहे.
असा रचला बनावट व्यवहाराचा सापळा: मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला एका मोठ्या ‘सिंडिकेट ग्रुप’चे सदस्य असल्याचे भासवून व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला. ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपी रमेश पुजारी याने तक्रारदार गौरव प्रकाश जैन यांच्याशी संपर्क साधला होता. बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी दोन व्यापाऱ्यांना भुलेश्वर येथील एका ठिकाणी बोलावले. तिथे व्यवहाराच्या ‘वेरिफिकेशन’च्या नावाखाली रोकड आणण्यास सांगितले.
साडेचार कोटींच्या व्यवहाराचा देखावा आणि पोबारा: आरोपींनी एखाद्या अधिकृत व्यवसायाप्रमाणे सेटअप तयार केला होता, जिथे टोळीतील सदस्य पैसे मोजणे, प्रतिनिधी म्हणून वावरणे आणि डिलिव्हरीचे नाटक करणे अशी कामे चोख पार पाडत होते. व्यापाऱ्यांनी आणलेली ३० लाख रुपयांची रोकड (१० लाख आणि २० लाख) ताब्यात येताच, सोने न देताच आरोपींनी तिथून पोबारा केला.
पोलिसांची मोठी कारवाई: तपासादरम्यान पोलिसांनी प्रदीप सिंग, रमेश पुजारी आणि मंगेश ढोणे यांना ओडिशा येथून अटक केली. टोळीचा प्रमुख मुस्तफा शेख गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता, त्यालाही या आठवड्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीने मुंबईपूर्वी चेन्नईमध्येही अशाच प्रकारे फसवणुकीचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आतापर्यंत ५ लाख रुपये हस्तगत केले असून, टोळीचा ‘हँडलर’ अद्याप फरार आहे.

