
नागपूर (pragatbharat.com) : “फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात आलेल्या सिंधी समाजाने शून्यातून विश्व उभे केले आहे. आज व्यापार असो वा इतर कोणतीही क्षेत्रे, सिंधी समाज आघाडीवर असून देशाच्या प्रगतीत या समाजाचे योगदान मोलाचे आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूरच्या जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित ‘विदर्भ सिंधी विकास परिषदे’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मालकी हक्काचा मार्ग मोकळा: या ऐतिहासिक सोहळ्यात नागपूर जिल्ह्यातील खामला, मेकोसाबाग आणि जरीपटका येथील सुमारे ३५० सिंधी बांधवांना जमिनीच्या मालकी पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वर्षांपासून सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात होत्या. मात्र, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता या बांधवांना ‘वर्ग-१’ चे शंभर टक्के मालकी हक्क प्राप्त झाले आहेत. यामुळे अनेक दशकांचा प्रलंबित प्रश्न निकाली निघाला आहे.
उल्हासनगरसाठीही विशेष निर्णय: मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ग्वाही दिली की, नागपूरप्रमाणेच उल्हासनगर येथील सिंधी बांधवांच्या घरांच्या नियमितीकरणाबाबतही लवकरच वेगळा आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या कार्यक्रमात ३६ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, ज्यापैकी १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर आमदार कुमार आयलानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, डॉ. विनकी रूघवानी आणि वीरेंद्र कुकरेजा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


