
मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. जुनैदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांसोबत काम करण्याबाबतचा एक मोठा खुलासा केला असून, “ती एक चूक महागात पडली” असे म्हणत त्याने भविष्यात वडिलांसोबत मोजकेच काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे ‘ती’ मोठी चूक? जुनैद खानने ‘महाराज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्याचे मोठे कौतुक झाले. मात्र, त्यानंतरचे त्याचे प्रकल्प बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकले नाहीत. जुनैदने सांगितले की, त्याने ‘एक दिन’ या चित्रपटाची स्क्रिप्ट वडील आमिर खानला ऐकवली होती. कथा ऐकून आमिर इतके भावूक झाले की त्यांनी स्वतः या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमिर खान यांच्या कामाची पद्धत जुनैदसाठी चिंतेचा विषय ठरली.
५ वर्षांत एकच चित्रपट! जुनैदच्या मते, आमिर खान हे उत्तम निर्माते असले तरी, त्यांना एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी किमान ५ वर्षांचा काळ लागतो. “माझे करिअर आता कुठे सुरू झाले आहे, अशा वेळी ५ वर्षांत एकच चित्रपट करणे मला परवडणारे नाही,” असे जुनैदने प्रांजळपणे कबूल केले. आमिर खान एखादी गोष्ट नियंत्रणात नसेल तर अस्वस्थ होतात, असाही खुलासा त्याने केला आहे. याच कारणामुळे त्याने आता आपल्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स वडिलांना न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉक्स ऑफिसवरील अपयश: सुनील पांडे दिग्दर्शित ‘एक दिन’ या चित्रपटात जुनैदसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती आमिर खाननेच केली होती, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. याशिवाय ‘लवयापा’ या चित्रपटाच्या वेळीही जुनैदला अपेक्षित यश मिळाले नाही. आपल्या करिअरला वेग देण्यासाठी जुनैदने आता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे ठरवले असून, वडिलांच्या सावलीतून बाहेर पडण्याचा त्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

