
कोलकाता (pragatbharat.com) : पश्चिम बंगालमधील सत्ता परिवर्तनानंतर राजकारणातील ‘रक्तचरित्र’ पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोमवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन भाजपचा विजय झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत ही मोठी राजकीय हत्या घडल्याने खळबळ माजली आहे.
भररस्त्यात निर्दयी हत्या: उत्तर २४ परगणा जिल्ह्यात मारेकऱ्यांनी आधी परिसराची रेकी केली आणि त्यानंतर चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या. सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, हा अत्यंत नियोजित आणि निर्दयी खून असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला निवडणुकीनंतरचा हिंसाचार या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाला आहे.
सुवेंदू अधिकारी यांचे ‘जायंट किलर’ म्हणून वर्चस्व: नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर, यंदा भवानीपूर मतदारसंघातूनही त्यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत करत ‘जायंट किलर’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. राज्यात भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतानाच त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची हत्या होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
‘महा-जंगलराज’ वरून टीका: या घटनेवर बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, “हे गेल्या १५ वर्षांच्या ‘महा-जंगलराज’ चे परिणाम आहेत. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने या घटनेची दखल घेतली असून केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. भाजप ही गुंडगिरी संपवण्याचे काम लवकरच सुरू करेल, फक्त थोडी प्रतीक्षा करा.”

