
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईच्या मासळी बाजारात मासे कापून विकण्यावर निर्बंध घालण्याच्या कथित निर्णयावरून आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत सरकारला “जिवंत कोंबडी आणि बकरा घरी न्यायचा का?” असा बोचरा सवाल विचारला आहे.
नेमका वाद काय? मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मासळी बाजारात मासे विक्रेत्यांना, विशेषतः कोळी महिलांना मासे कापून देण्यास मनाई केल्याचे समोर आले आहे. बाजारात मासे कापल्यामुळे अस्वच्छता पसरते आणि दुर्गंधी निर्माण होते, असे कारण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, “मासे अख्खेच विका, अन्यथा दंडात्मक कारवाई करू,” अशा इशाऱ्यामुळे कोळी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ठाकरे गटाचे खुले आव्हान: अखिल चित्रे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारवर जोरदार टीका केली आहे. “कोळी बांधव मुंबईत वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने मासे विकत आले आहेत, त्याच पद्धतीने विकणार. मुंबईच्या खऱ्या मानकरींना डिवचण्याचा प्रयत्न महापालिकेने करून पाहावाच, आम्हीही पाहून घेऊ,” अशा शब्दांत त्यांनी थेट आव्हान दिले आहे.
“अस्वच्छतेचा नियम फक्त माशांनाच का?” चित्रे यांनी आपल्या टीकेत प्रशासनाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे. “जर अस्वच्छतेचे कारण पुढे करून मासे कापण्यास बंदी घातली जात असेल, तर मग ग्राहकांनी चिकन घेताना जिवंत कोंबडी आणि मटण घेताना जिवंत बकरा घरी न्यायचा का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामागे कोळीवाड्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. या वादामुळे आगामी काळात प्रशासन आणि कोळी समाज यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.


