बारामतीचा वारसदार कोण? युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार संघर्षाची ठिणगी; पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीमुळे चर्चांना उधाण

बारामती (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती मतदारसंघात आता भविष्यातील राजकीय वारसदार कोण, यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या राजकीय अवकाशात आता पवार कुटुंबातील तिसरी पिढी आमनेसामने येण्याचे संकेत मिळत आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भविष्यात कुटुंबात राजकीय संघर्ष होणार नाही, अशी भूमिका मांडली असली तरी जमिनीवरील चित्र वेगळे दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. लोकांच्या समस्या सोडवणे आणि जनसंपर्क वाढवण्यावर त्यांचा भर असून, “जो जनतेचे प्रश्न सोडवेल, त्यालाच बारामतीकर साथ देतील,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही मतदारसंघात सक्रियता वाढवली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते जनता दरबार भरवत असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यातच रोहित पवार यांचीही बारामतीतील एन्ट्री आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेशी असलेली असहमती यामुळे पवारांमधील राजकीय विरोध कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे २०२९ मध्ये बारामतीच्या गादीवर कोण बसणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *