
भागलपूर (pragatbharat.com) :
भारतीय क्रिकेट वर्तुळातून सध्या बिहारच्या खेळाडूंचा मोठा डंका पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडूने देशाचे लक्ष वेधले होते, तर आता बिहारच्याच एका १५ वर्षांच्या मुलीने क्रिकेटच्या मैदानावर धावांचा असा पाऊस पाडला आहे, ज्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली आहे. बिहारची उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू अक्षरा गुप्ता (Akshara Gupta) हिने ‘बिहार क्रिकेट असोसिएशन महिला अंडर-१९ वन-डे ट्रॉफी’ (Bihar Cricket Association Women’s U-19 One-Day Trophy) स्पर्धेत अवघ्या १२६ चेंडूंमध्ये ३०६ धावांची नाबाद आणि ऐतिहासिक त्रिशतकी खेळी साकारली आहे.
१२६ चेंडू, ५५ चौकार अन् ८ षटकार: भागलपूर येथील सँडिस कंपाउंड मैदानावर गुरुवारी टीम ‘ए’ आणि टीम ‘सी’ यांच्यात हा सामना खेळवला गेला. डंकन अकॅडमीमध्ये १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अक्षराने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. तिने अवघ्या १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, तर अवघ्या ३४ चेंडूंमध्ये आपले शतक झळकावले. तिचा स्ट्राईक रेट २४२.८६ चा होता. या ऐतिहासिक ३०६ धावांच्या वादळी खेळीदरम्यान अक्षराने तब्बल ५५ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
गावात क्रिकेटची कोणतीही सोय नाही: अक्षराचा हा प्रवास अत्यंत थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे, कारण तिच्या गावात क्रिकेट खेळण्यासाठी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. अक्षराचे काका रामकृपा गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात मैदान किंवा नेटची सोय नसल्याने कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी मिळून घराशेजारीच एक काँक्रीटची खेळपट्टी (Concrete Wicket) तयार केली होती. अक्षरा वयाच्या ६ व्या वर्षापासून तिचा भाऊ ऋषी आणि त्याच्या मित्रांसोबत याच काँक्रीटच्या खेळपट्टीवर सराव करत असे. ती तिच्या गावातून क्रिकेट खेळणारी पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.
वडील चालवतात चिकनचा व्यवसाय: अक्षराचे वडील राजकिशोर गुप्ता हे गावात चिकनचा व्यवसाय चालवतात, तर आई रिना या गृहिणी आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि सुविधांचा अभाव असतानाही केवळ कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अक्षराने रचलेला हा इतिहास कौतुकास पात्र ठरला आहे. बिहारमधून एकामागून एक येणारे हे तरुण हिरे पाहून भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये बिहारचे वर्चस्व पाहायला मिळेल, अशी आशा क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


