भाजप विधानपरिषद निवडणूक २०२६: दिल्लीतून ‘स्पेशल मेसेज’, पराभूत नेत्यांचा पत्ता कट; नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?

मुंबई (pragatbharat.com) : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भाजप हायकामांडने राज्यातील नेतृत्वाला एक स्पष्ट संदेश धाडला असून, यामुळे अनेक प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या नव्या ‘फिल्टर’मुळे निम्म्याहून अधिक इच्छुकांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे दिल्लीचा ‘तो’ मेसेज? भाजपच्या केंद्रीय धोरणानुसार, ज्या नेत्यांचा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे, अशा नेत्यांना यंदा विधानपरिषदेवर पाठवू नये, असा कडक पवित्रा हायकमांडने घेतला आहे. केवळ सत्तेचे पुनर्वसन करण्यापेक्षा संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यावर दिल्लीने भर दिला आहे.

या नेत्यांची धाकधूक वाढली: या निर्णयामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेक बड्या नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. राज्यातून तब्बल ३० नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली होती, मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या या ‘नो रिपीट’ आणि ‘नो डिफीटेड’ धोरणामुळे यातील निम्मी नावे बाद झाल्याचे समजते. यामुळे आता भाजपकडून कोणाला लॉटरी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जातीय समीकरणे साधणार: भाजप आपल्या कोट्यातील जागांवर उमेदवारी देताना केवळ निष्ठाच नाही, तर आगामी निवडणुका लक्षात घेता जातीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करणार आहे. १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने, येत्या २४ ते ४८ तासांत भाजपची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *