“मोडून तोडून माझं वक्तव्य सांगू नका..”; आक्रमक छगन भुजबळांचे पद वाटपाबाबत थेट घुमजाव, ‘या’ कारणामुळे बदलली भूमिका

मुंबई (pragatbharat.com) : राज्यसभेची उमेदवारी आणि मंत्रिमंडळ विस्तारात पुतण्या समीर भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे उघड नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवरून मोठे घुमजाव केले आहे. “इतरांच्या मुलाला जो न्याय तोच मला मिळावा” असे म्हणणारे भुजबळ आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर कमालीचे मवाळ झालेले पाहायला मिळाले. “माझे वक्तव्य मोडून तोडून सांगू नका, पक्ष सगळ्यांनाच न्याय देण्याचे काम करत असतो,” अशी नवी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केली.

“पदे कमी असतात, प्रत्येकाने काम केले पाहिजे” काही दिवसांपूर्वी पक्षातील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष बोट ठेवत भुजबळांनी खळबळ उडाली होती. मात्र, आज त्यांनी सावध भूमिका घेत म्हटले, “मी आधी जे बोललो, त्याचा चुकीचा अर्थ काढू नका. पक्षात काही जण कष्ट करून पुढे आले आहेत. अजित पवार पक्षाबाहेर गेले, त्यानंतर सुनेत्रा ताई पुढे आल्या. अनेकांना वाटते की आम्हाला पद दिले नाही, पण पदे मर्यादित असतात आणि काम करणारे जास्त असतात. प्रत्येकाने आपले काम करत राहिले पाहिजे, पक्ष सर्वांना योग्य वेळी न्याय देतो. आता सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.”

‘कबड्डीचा खेळाडू’ ते ‘मवाळ भूमिका’ समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने कालच भुजबळांनी “अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल, कल नही तो परसो. मैं कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हूं,” असे म्हणत आपण डावे-उजवे राजकारण न करता थेट लढणारे आहोत, असे संकेत दिले होते. मात्र, २४ तासांच्या आत त्यांनी या विधानावरून फारकत घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने पक्षांतर्गत वाद वाढू नये, म्हणूनच भुजबळांनी ही मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गिरगाव बंगला नोटीस प्रकरणावर स्पष्टीकरण यावेळी गिरगावमधील एका जागेच्या वादात मंत्र्यांच्या बंगल्याचा पत्ता वापरून जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या प्रकरणावरही भुजबळांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “त्या प्रकरणाशी आमचा कोणताही थेट संबंध नाही. आमच्या बंगल्यात धोबी समाजाचा आमचा एक बांधव राहतो, त्याचा मुलगा नुकताच वकील झाला आहे. त्याने नवशिकेपणामुळे जाहिरातीत बंगल्याचा पत्ता टाकला होता. पोलिसांनी तपास करून त्याला ताब्यात घेतले आहे. बंगल्यात अनेक सेवक आणि त्यांची मुले राहतात, त्या मुलाने ही चूक केली असून यात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही.” या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात आधीच तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *