रविदासिया धर्माचे तिसरे पवित्र स्थान निर्माण करणारे महान संत सुखदेव जी महाराज काळाच्या पडद्याआड. चर्मकार समाजावर शोककळा; चंदीगड येथे झाले दुःखद निधन; सोमवारी कात्रज येथे होणार अंत्यसंस्कार

पुणे (pragatbharat.com) : कात्रज (पुणे) येथे चर्मकार समाजाच्या आणि देशातील ‘रविदासिया’ धर्माचे तिसरे पवित्र स्थान निर्माण करणारे महान संत सुखदेव जी महाराज (वय ७५) यांचे रविवारी, २१ जून २०२६ रोजी अल्पशा आजारामुळे चंदीगड (पंजाब) येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने चर्मकार समाजाची आणि संपूर्ण सामाजिक चळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.


संत सुखदेव जी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य चर्मकार समाजाच्या उत्कर्षासाठी आणि सेवेसाठी वेचले. कात्रज, पुणे येथे त्यांनी अत्यंत भव्य असे ‘संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर’उभारले, जे आज देशातील रविदासिया धर्माचे तिसरे सर्वात मोठे आणि पवित्र धर्मस्थान मानले जाते. एक महान कर्मयोगी आणि कट्टर परिवर्तनवादी संत म्हणून त्यांची देशभरात ख्याती होती. त्यांच्या विचारांनी आणि कार्यामुळे समाजाला नेहमीच प्रगतीची नवी दिशा मिळाली.
संत सुखदेव वाघमारे महाराज यांचे पार्थिव चंदीगडहून अंत्यदर्शनासाठी पुण्यात आणण्यात येणार आहे. *त्यांचा अंत्यविधी सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘गुरु रविदास मंदिर, तिसरे धर्मस्थान, कात्रज, पुणे’ येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.


भावपूर्ण श्रद्धांजली:
“संत सुखदेव जी महाराज यांचे आपल्यातून निघून जाणे ही सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत मोठी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि वाघमारे कुटुंबावर कोसळलेले हे अपार दुःख सावरण्याची शक्ती त्यांना देवो,” अशा शब्दांत साप्ताहिक प्रगत भारत’चे संपादक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रय कांबळे यांनी वृत्तपत्र आणि महासंघाच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *