
मुंबई (pragatbharat.com) : आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय यांची आज (२२ मे) जयंती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय समाजात पसरलेल्या अनिष्ठ रूढी-परंपरा, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी पुकारलेला लढा इतिहासप्रसिद्ध आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण केले जात आहे.
सती प्रथा बंदीसाठी ऐतिहासिक लढा: राजा राममोहन रॉय यांचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक कार्य म्हणजे त्यांनी ‘सती प्रथा’ बंद करण्यासाठी केलेले प्रयत्न होय. त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे ब्रिटीश सरकारने १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा मंजूर केला. याशिवाय त्यांनी बालविवाह विरोधी आणि विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ मोठे जनमत तयार केले. स्त्रियांना शिक्षणाचा आणि मालमत्तेचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी त्या काळात घेतली होती.
‘ब्राह्मो समाज’ आणि शैक्षणिक कार्य: धार्मिक सुधारणांसाठी त्यांनी १८२८ मध्ये ‘ब्राह्मो समाजाची’ स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी एकेश्वरवादाचा प्रसार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन भारतात रुजवण्यासाठी त्यांनी अनेक शाळांची स्थापना केली. त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकजागृतीचे मोठे कार्य केले, म्हणूनच त्यांना भारतीय पत्रकारितेचे अग्रदूतही मानले जाते.
वैचारिक वारसा: राजा राममोहन रॉय यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. एका समतावादी, विज्ञाननिष्ठ आणि प्रगत समाजाची निर्मिती हेच त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रगत भारत’ परिवाराकडून या थोर समाजसुधारकाला विनम्र अभिवादन!

