
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा आज १४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे या सर्व सदस्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून देण्यात आलेल्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दिकी हे सदस्य आज शपथ घेतील.
या व्यतिरिक्त, पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव या देखील आज सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या पुन्हा विजयी झाल्या आहेत. आज शपथ घेणाऱ्या १० सदस्यांमुळे विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल आणि कामकाजाला गती मिळणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंबादास दानवे यांच्या पुनर्निवडीमुळे सभागृहातील चर्चेचा स्तर उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

