
मुंबई (pragatbharat.com) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटातून एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या यादीनुसार, पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या आणि महत्त्वाचे आर्थिक अधिकार आता पूर्णपणे पवार कुटुंबाच्या हाती एकवटले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे, म्हणजेच पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे पक्षाची मोठी पदे सोपवली आहेत.
निवडणूक आयोगाला २९ एप्रिल रोजी सादर केलेल्या पत्रानुसार, पार्थ पवार यांची पक्षाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे पक्ष समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी असेल. दुसरीकडे, जय पवार यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आले असून त्यांच्याकडे राष्ट्रीय शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदासह ‘खजिनदार’ पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जय पवार यांच्यासोबत शिवाजीराव गर्जे हे देखील खजिनदार म्हणून काम पाहतील, मात्र लेखापरीक्षण आणि हिशोबाचे मुख्य काम गर्जे यांच्याकडे असेल.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रण. यापूर्वी बँकेतील व्यवहार आणि आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी यांच्याकडे होते. मात्र, नव्या रचनेनुसार आता पक्षाचे आर्थिक व्यवहार हाताळण्याचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार, राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवार आणि खजिनदार म्हणून जय पवार या तिघांच्या स्वाक्षरीने चालणार आहेत.
दरम्यान, या यादीत काही तांत्रिक चुका असल्याचे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही सुधारित यादी जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी यांना आर्थिक व्यवहारांच्या प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आल्याचे या यादीवरून स्पष्ट होत आहे, ज्यामुळे पक्षात मोठे फेरबदल झाल्याचे चित्र दिसत आहे.

