सावधान! तुमच्या मोबाईलवर सायरन वाजला तर घाबरू नका; केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम’ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (pragatbharat.com) : केंद्र सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप घेत, आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम’ (Cell Broadcast System) लाँच केली आहे. या प्रणालीची चाचणी म्हणून आज दुपारी देशभरातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर अचानक सायरन वाजवून एक नोटीफिकेशन पाठवण्यात आले. यामुळे काही काळ नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता, मात्र हे केवळ चाचणीचे भाग असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

काय आहे ही प्रणाली? केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रणालीची माहिती दिली. ते म्हणाले की, जर तुमच्या मोबाईलवर असा संदेश आला, तर घाबरण्याची गरज नाही. ही दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेली नवीन आपत्ती संवाद प्रणाली आहे. भविष्यात पूर, भूकंप किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत आणि त्यांच्या लोकेशननुसार तात्काळ सावध करण्यासाठी याचा वापर केला जाईल.

चाचणी संदेशाचा आशय: आज झालेल्या चाचणी दरम्यान मोबाईलवर ‘Alert citizens, safe nation’ असा संदेश झळकला. हा संदेश केवळ चाचणीसाठी असल्याने जनतेने त्यावर कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही प्रणाली इतकी प्रगत आहे की, मोबाईल सायलेंटवर असला तरीही आपत्तीच्या वेळी मोठा सायरन वाजवून तो नागरिकांचे लक्ष वेधून घेईल.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल: दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, ही एक प्रगत सार्वजनिक अलर्ट फ्रेमवर्क आहे. यामुळे संकटकाळात माहिती पोहोचवण्याचा वेग वाढेल आणि जीवितहानी कमी करण्यास मदत होईल. देशाची आपत्कालीन संप्रेषण यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रतिसाद देणारी बनवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आता परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व देखील कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *