
मुंबई (pragatbharat.com) : “पोलीस दलात कार्यरत असताना हिमांशू रॉय यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. हिमांशू रॉय फाउंडेशनच्या वतीने संशोधित केलेले ‘हिमांशू रॉय कॅन्सर डिटेक्शन किट’ कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळातील निदानासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. हे कार्य त्यांना खऱ्या अर्थाने दिलेली मोठी श्रद्धांजली आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्कारामुळे समाजाच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव होत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित ‘द हिमांशू रॉय लिगसी पुरस्कार’ वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि हिमांशू रॉय फाउंडेशनच्या संस्थापक भावना रॉय प्रामुख्याने उपस्थित होत्या.
गुन्हेगारी मोडीत काढण्यात सिंहाचा वाटा – मुख्यमंत्री: हिमांशू रॉय यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई लोकल मधील साखळी बॉम्बस्फोटाचा तपास आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख म्हणून त्यांनी केलेले कार्य राष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. दुर्दैवाने त्यांचा कर्करोगाशी दिलेला लढा अयशस्वी ठरला, मात्र त्यांचे विचार फाउंडेशनच्या माध्यमातून जिवंत आहेत.
२० हजार नागरिकांना कर्करोग निदान किटचा लाभ: हिमांशू रॉय प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात तब्बल २० हजार लोकांना ‘कॅन्सर डिटेक्शन किट’च्या माध्यमातून कर्करोगाच्या लवकर निदानासाठी मोफत लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत जाहीर केले की, राज्य शासनाने कर्करोगाविरुद्ध सुरू केलेल्या मोठ्या मोहिमेचा भाग म्हणून प्रतिष्ठानच्या या कार्याला जोडून घेतले जाईल आणि महाराष्ट्र शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल.
शहीद तुकाराम ओंबळे यांना मरणोत्तर पुरस्कार: या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील दिग्गजांना सन्मानित करण्यात आले:
- राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्र: मुंबई दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडणारे शहीद तुकाराम गोपाल ओंबळे यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कन्या वंदना ओंबळे-पटणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- संगीत क्षेत्र: गंधर्व संगीत महाविद्यालय आणि ख्यातनाम गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
- वैद्यकीय क्षेत्र: नामांकित तज्ज्ञ डॉ. झरीर उदवाडिया आणि डॉ. शेखर भोजराज यांना सन्मानित करण्यात आले.
याशिवाय, फाउंडेशनच्या रुग्ण सेवेत कार्यरत असलेले अमिताभ शहा आणि ऋषभ शहा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या भव्य सोहळ्याला मनोरंजन, वैद्यकीय, बांधकाम आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


