
मुंबई (pragatbharat.com) : राज्यातील सर्वसामान्य, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत अत्याधुनिक आणि विशेष आरोग्य सेवा वेळेत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आगामी १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक आरोग्य तपासणी आणि विशेष वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
रक्तदान आणि कर्करोग तपासणीवर विशेष भर राज्यात सध्या जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिरांमध्ये रक्तदान मोहिमेवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत खालील प्रमुख तपासण्या आणि उपचार मोफत केले जातील:
- कर्करोग निदान (Cancer Screening): मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची (Cervical Cancer) प्राथमिक तपासणी, लवकर निदान आणि समुपदेशन.
- हाडांची घनता तपासणी (BMD): वाढत्या वयासोबत होणारी हाडांची झिज रोखण्यासाठी गुडघा व खुब्याच्या सांध्याची तपासणी आणि अस्थिरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
- विशेष शस्त्रक्रिया शिबिरे: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि बारामती येथे ख्यातनाम तज्ज्ञ डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) हर्निया शस्त्रक्रिया आणि स्थूलता (Obesity) तपासणी केली जाईल. तसेच अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या सुजेसाठी (Varicose Veins) डॉप्लर तपासणी शिबिरही पार पडेल.
अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती या संपूर्ण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर अधिष्ठाता (Dean) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत निवासी डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका, लॅब तंत्रज्ञ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक असतील.
मंत्री मुश्रीफ यांनी निर्देश दिले की, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गरजेनुसार रुग्णांवर मोफत ऑपरेशन्सची सोय केली जावी. तसेच, अवयव प्रत्यारोपण (Organ Transplant) आणि इतर महत्त्वाच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी ‘सीएसआर’ (CSR) फंडाची मदत घेतली जाईल. शिबिरांच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


