ग्रामीण भागासाठी मोठी घोषणा! गावकऱ्यांना मोफत मिळकत पत्रिका मिळणार; सनद फी माफ करण्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई (pragatbharat.com) : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत ‘नमुना ८’ दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका (Property Card) दिली जाणार असून, त्यासाठीची सनद फी पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करून मंजुरी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

३९ लाख मालमत्तांची मोजणी पूर्ण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतींमधील सुमारे ३९ लाख मालमत्तांची मोजणी पूर्ण केली आहे. कोकण विभागीय आयुक्तालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सचिव चंद्रकांत पुलकुंडवर आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

मालमत्तांचे वाद मिटणार: स्वामित्व योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मालमत्तांचे अचूक रेकॉर्ड तयार करणे हा आहे. आतापर्यंत १८ हजार प्रॉपर्टी कार्डचे ऑनलाइन काम पूर्ण झाले आहे. ज्या गावांचे काम पूर्ण झाले आहे, त्या गावांचे अंतिम नकाशे आणि चौकशी नोंदवही ग्रामपंचायतींना मोफत दिली जाईल. याशिवाय, गावठाणच्या बाजूने २०० मीटरपर्यंतच्या मालमत्तांचे मोजमाप करून ते रहिवासी भागासाठी अधिकृत केले जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे वाद मिटून नागरिकांना त्यांच्या घरांचा कायदेशीर मालकी हक्क मिळणे सोपे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *