
मुंबई (pragatbharat.com) : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आज (शुक्रवार) दुपारी ३ वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या (मविआ) वरिष्ठ नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेऊन मतदार यादी प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर आयोग काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचे ३२ मुद्दे आणि गंभीर आरोप: शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी आयोगाला ३२ हरकती आणि सूचनांचे निवेदन सादर केले आहे. कागदपत्रे पूर्ण असतानाही अनेक पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. “आमचा एसआयआर प्रक्रियेला विरोध नाही, पण ती पारदर्शक असावी. पश्चिम बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ देणार नाही,” असा थेट इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
बीएलओ (BLO) नियुक्त्यांवरून वाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या नियुक्त्यांमध्ये राजकीय दबाव असल्याचा दावा केला आहे. भाजपकडे सध्या ५२ हजारांहून अधिक बीएलओ असल्याचा दावा केला जात असून, यामुळे इतर पक्षांना समान संधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जाणीवपूर्वक नावे कमी केल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आयोगाकडून स्पष्टीकरणाची शक्यता: निवडणुकांना अजून तीन वर्षांचा अवधी शिल्लक असल्याने आयोगाने या प्रक्रियेसाठी घाई करू नये, अशी मविआची मागणी आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले ३२ मुद्दे आणि आरोपांवर आजच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम काय सविस्तर स्पष्टीकरण देतात, यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

