नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी; मुंबईतील महाअधिवेशनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आवाहन

मुंबई (pragatbharat.com) : “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील एक अत्यंत महत्त्वाचे साधन असले, तरी संपूर्ण भविष्य केवळ एआयवर अवलंबून नाही. तंत्रज्ञानाच्या वापराला दिशा देणारी मानवी बुद्धिमत्ता, विवेक, सद्सद्विवेकबुद्धी आणि मूल्ये यावरच मानवाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना सत्य पडताळणी (Fact-Check) आणि आपली संपादकीय जबाबदारी नेहमी अबाधित राखावी,” असे आग्रही आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

या प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास, सकाळ मीडिया समूहाचे समूह संपादक निलेश खरे, वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक, मृणालिनी नानिवडेकर, मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष किरण जोशी यांच्यासह राज्यभरातून आलेले असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. या अधिवेशनात मुख्यत्वे आधुनिक पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राच्या पत्रकारितेला समृद्ध वारसा: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक भूमीचे कौतुक केले. ते म्हणाले की, संतांच्या समता आणि बंधुभावाच्या संदेशासोबतच लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांनी लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे जे अद्वितीय कार्य केले, त्याचाच समृद्ध वारसा आजच्या पत्रकारांना लाभला आहे. उदारीकरणानंतर उपग्रह वाहिन्या, इंटरनेट, डिजिटल पोर्टल्स आणि पॉडकास्टमुळे माहिती प्रसारणाची पद्धत पूर्णपणे बदलली असून माध्यम संस्थांना सातत्याने अपडेट राहावे लागत आहे.

डीपफेक आणि खोट्या बातम्यांचे आव्हान: एआयमुळे पत्रकारांचे काम सोपे होत असले, तरी डीपफेक तंत्रज्ञान (Deepfake) आणि बनावट दृश्य सामग्रीच्या माध्यमातून समाजात मोठा संभ्रम आणि खोटी माहिती पसरवण्याचा धोका वाढला असल्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांचा माध्यमांवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारांची भूमिका आता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने त्यांनी सर्व विद्यापीठांना माध्यम अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता, डिजिटल नैतिकता आणि डेटा पत्रकारिता या विषयांचा तातडीने समावेश करण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *