
मिरा-भाईंदर (pragatbharat.com) : मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधील उत्तन परिसरात जिवंत तोफगोळा (Live Artillery Shell) सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, स्थानिक पोलिसांची तत्परता आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे हा मोठा संभाव्य अनर्थ टळला आहे. उत्तन परिसरातील जमिनीत गाडलेला एक संशयास्पद धातूचा गोळा स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला होता. नागरिकांनी कोणताही उशीर न करता याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच मिरा-भाईंदर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक तपासणीत ती वस्तू साधी नसून धोकादायक अविस्फोटित स्फोटक (UXO) असण्याची शक्यता त्यांनी ओळखली.
NSG कडून तांत्रिक प्रक्रियेद्वारे तोफगोळा यशस्वीरित्या निकामी परिस्थितीचे गांभीर्य आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी सर्वोच्च यंत्रणा असलेल्या ‘एनएसजी’ (NSG) च्या तज्ज्ञ पथकाला पाचारण केले. एनएसजीचे विशेष पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसर सुरक्षित केला. सर्व कडक सुरक्षा नियमांचे पालन करत, बुधवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास विशेष तांत्रिक प्रक्रियेद्वारे हा जिवंत तोफगोळा अत्यंत सुरक्षितपणे निकामी (Defused) करण्यात आला. एनएसजी आणि पोलिसांच्या या संयुक्त आणि धाडसी कारवाईमुळे मिरा-भाईंदर शहरावरील मोठे संकट टळले असून या मोहिमेदरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. तोफगोळा कित्येक वर्षांपूर्वीचा जुना असून तो पोर्तुगीज काळातील आहे की महायुद्धाच्या काळातील, याचा तपास आता केला जात आहे.
पोलिसांना मिळालेल्या विशेष प्रशिक्षणाचा मोठा फायदा या संपूर्ण कारवाईत सर्वात महत्त्वाची भूमिका ठरली ती स्थानिक पोलिसांच्या सतर्कतेची. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ‘क्षमता विकास उपक्रमांतर्गत’ (Capacity-Building Program) एनएसजीकडून मिरा-भाईंदर पोलिसांना आयईडी (IED) आणि विविध प्रकारच्या स्फोटक सामग्रीची अचूक ओळख पटवण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा थेट फायदा या घटनेत पाहायला मिळाला. स्थानिक पोलिसांनी वेळेत धोका ओळखून योग्य पावले उचलल्यामुळे आणि वरिष्ठ यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली. दरम्यान, परिसरात कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला स्वतः हात न लावता, तात्काळ पोलिसांना नियंत्रण कक्षावर माहिती द्यावी, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना केले आहे.


