‘मराठी माणसाला दाखवून द्या, मुंबईवर आपलं वर्चस्व…’; प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर जैन धर्मीयाच्या कथित वादग्रस्त रिप्लायचा स्क्रीनशॉट व्हायरल, सोशल मीडियावर संताप

मुंबई (pragatbharat.com) : घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी ओढण्यात आलेल्या ‘पांढऱ्या पट्टी’चा (White Line) वाद आता मिटला असला, तरी सोशल मीडियावर यावरून नवा प्रादेशिक आणि सामाजिक वाद पेटला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Youtuber Prasad Vedpathak) याने पांढरी पट्टी हटवल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, एका युझरने केलेल्या कथित वादग्रस्त रिप्लायचा स्क्रीनशॉट सध्या फेसबुक आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमधून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवरील ‘तो’ वादग्रस्त रिप्लाय काय? प्रसाद वेदपाठकने पांढरी पट्टी हटवल्यानंतर “माझ्यासाठी हा प्रश्न संपला…” अशी पोस्ट केली होती. मात्र, ‘श्रमण’ नावाच्या एका ट्विटर हँडलवरून त्याची पोस्ट रिट्विट करत एका व्यक्तीने अत्यंत वादग्रस्त विधान केले. त्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “आपण जैनांनी मुंबईत केवळ जैनांसाठीच असलेल्या स्वतंत्र वसाहती (सोसायट्या) उभारल्या पाहिजेत आणि त्यामध्ये कोणत्याही मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे की या शहरावर आपले वर्चस्व आहे आणि आपणच इथले सर्वेसर्वा आहोत…” या विधानामुळे सोशल मीडियावर प्रादेशिक अस्मितेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

फेसबुक पेजवरून सडेतोड उत्तर आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: हा वादग्रस्त स्क्रीनशॉट फेसबुकवरील ‘अजिंठा’ नावाच्या एका लोकप्रिय पेजने शेअर करत संबंधित युझरचा चांगलाच समाचार घेतला आहे. “हा यांचा खरा चेहरा आहे. ‘जैन ओन्ली’ सोसायट्या तयार करून मराठी लोकांना हाकला म्हणतोय हा गडी. मुंबईवर राज्य करायला तू स्वतःला डॉन समजतोय की काय? गावागावात अशा सोसायट्या बनवण्यापेक्षा तू एक स्वतंत्र देश बनवून त्यातच शिफ्ट का नाही होत?” अशा शेलक्या शब्दांत या पेजने आक्षेप नोंदवला आहे. या पोस्टवर हजारो मराठी युझर्सनी कमेंट्स करत मुंबईत मराठी माणसा डावलण्याच्या मानसिकतेचा तीव्र निषेध केला आहे.

नेमका काय होता पांढऱ्या पट्टीचा वाद? घाटकोपरमधील प्रसाद वेदपाठक राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात काही जैन कुटुंबीयांनी इतर कोणाचीही परवानगी न घेता पांढऱ्या रंगाची पट्टी मारली होती. जैन धर्मगुरू (साध्वी) यांच्या चातुर्मास आणि धार्मिक नियमांच्या सुविधेसाठी ही पट्टी मारल्याचे सांगण्यात आले होते. यावर प्रसादने आक्षेप घेत सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कुणाचीही परवानगी न घेता केलेल्या कृत्यामुळे आपल्या कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा केला होता. हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्याने ही पट्टी हटवण्याची मागणी केली होती. अखेर सोसायटी प्रशासनाने त्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून ती पूर्णपणे हटवली असून, प्रशासकीय पातळीवर हा वाद मिटला असला तरी डिजिटल विश्वात मात्र यावरून वादळ उठले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *