
ठाणे (pragatbharat.com) : ठाणे जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. ठाण्यातील बाळकूम परिसरात असलेल्या रेवाळे तलावात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या घटनेत मुंब्रा रेल्वे पुलावरून खाडीत पडून एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांनंतर स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून सविस्तर तपास सुरू केला आहे.
रेवाळे तलावातील धक्कादायक घटना: मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पश्चिम येथील बाळकूम, यशस्वी नगर भागातील रेवाळे तलावात (Rewale Lake) एक मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (RDMC) कापूरबावडी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने तात्काळ बचाव मोहीम राबवून महिलेचा मृतदेह तलावाबाहेर काढला. मृत महिलेची ओळख पटली असून, तिचे नाव सोनी गायकवाड (वय ३५) असून ती मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कापूरबावडी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंब्रा खाडीत पडून तरुणाचा अंत: दुसऱ्या एका घटनेत, मुंब्रा येथील संतोष नगर भागातील रेल्वे फास्ट ट्रॅक पुलावरून (Mumbra Railway Fast Track Bridge) खाडीत पडल्याने जलाल उद्दीन वकार अली (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास जलाल उद्दीन याचा पुलावर तोल गेला आणि तो थेट खाडीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस आणि अग्निशामक दलाने रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम राबवली. काही वेळातच जवानांनी तरुणाचा मृतदेह खाडीबाहेर काढून मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केला.


