
नागपूर/मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव आल्याचा दावा केला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे (BJP) बडे नेते आणि आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी शरद पवार आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत उपरोधिक आणि खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ – संजय राऊतांना टोला: आमदार आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचताना एक मोठा दावा केला. ते म्हणाले, “शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार आहे. तर दुसरीकडे, ‘उबाठा’ गटही काँग्रेसमध्ये विलीन करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्याची सुप्त इच्छा ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ (संजय राऊत) यांची असू शकते. याच अनुषंगाने संजय राऊतांनी विलीनीकरणावर विधाने केली असावीत.” ‘मरता क्या न करता’ अशी स्थिती सध्या विरोधकांची झाली असून, त्यांचे खासदार महायुतीमध्ये येण्यासाठी आतुर असल्याचा दावाही देशमुख यांनी केला.
नागपूर विधान परिषदेत भाजपच जिंकणार: यावेळी आशिष देशमुख यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीवरही (Vidhan Parishad Election) भाष्य केले. नागपूर जिल्ह्यातील राजकीय गणितांचा दाखला देत ते म्हणाले, “नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे ८० टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. राजीव पोतदार (Dr. Rajiv Potdar) हे शंभर टक्के विजयी होतील.” दरम्यान, विलीनीकरणाच्या या सर्व चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आधीच ‘हवेतील गप्पा’ म्हटले असल्यामुळे, केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी या वावड्या उठवल्या जात आहेत का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


