केंद्रीय मंत्र्यासोबत लग्न आणि लिंकअपच्या चर्चांवर कंगना रणौतने अखेर सोडलं मौन; वयाच्या ४० व्या वर्षी लग्नाबद्दल दिली मोठी अपडेट!

मुंबई/नवी दिल्ली (pragatbharat.com) : बॉलिवूड गाजवल्यानंतर राजकारणात दमदार एन्ट्री करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील ‘मंडी’ मतदारसंघाच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्या खासगी आयुष्याची सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्यासोबत कंगनाचे नाव जोडले जात असून, दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. या सर्व चर्चांवर आणि “लग्नाचा विचार काय आहे?” या प्रश्नावर स्वतः कंगना रणौतने एका मुलाखतीत स्पष्ट आणि रोखठोक उत्तर दिले आहे.

“फक्त संवाद साधला तरी नावाच्या चर्चा होतात” – कंगना: केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबत रंगणाऱ्या लिंकअपच्या चर्चांवर बोलताना कंगना म्हणाली, “लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, पण प्रत्यक्षात असे काहीही नाही. तुम्ही जर सिंगल असाल आणि संसदेत किंवा इतर कुठे कोणासोबत सलोख्याने संवाद साधला, तरीही लोक थेट नावाच्या चर्चा सुरू करतात. मी माझे आयुष्य कधीच लपवून ठेवलेले नाही, ते नेहमीच उघड्या पुस्तकासारखे राहिले आहे. त्यामुळे जेव्हा कधी माझ्या आयुष्यात खरोखरच लग्नाची वेळ येईल, तेव्हा मी स्वतःहून सर्वांना उघडपणे सांगेन.”

वयाच्या ४० व्या वर्षी पालकांच्या दबावावर मिश्कील उत्तर: “लग्नासाठी आई-वडिलांचा दबाव आहे का?” या प्रश्नावर कंगनाने आपल्या नेहमीच्या फटकळ शैलीत उत्तर दिले. ती म्हणाली, “आता मी वयाच्या ४० व्या वर्षात पदार्पण करत असताना माझे आई-वडील मला काय बोलणार? त्यांनी आता मला सांगणे केव्हाच सोडून दिले आहे. १० वर्षांपूर्वी ते माझ्या पाठीमागे लागायचे की लग्न कर, पण तेव्हा मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. आता त्यांनाही फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात रिलेशनशिप्सचे अनेक अनुभव घेतले आहेत, त्यामुळे कोणतीच गोष्ट राहून गेली आहे असे मला वाटत नाही. लग्न झाले तरी ठीक आणि नाही झाले तरी ठीक.” दरम्यान, कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagya Vidhata) या चित्रपटामुळे देखील चांगलीच चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *