मुंबईत हेल्थ-टेक कंपनीच्या CEO विरुद्ध ३४ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा; माजी महिला कर्मचाऱ्याला पैशांसाठी गंडा, यूकेच्या बनावट बिलाचा वापर

मुंबई/कालाचौकी (pragatbharat.com) : मुंबईतील एका नामांकित हेल्थ-टेक (Health-Tech) स्टार्टअप कंपनीमध्ये कामाच्या ठिकाणी सुरू झालेल्या मैत्रीचा शेवट अखेर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक आणि पोलीस गुन्ह्यात झाला आहे. कंपनी संकटात असल्याचे सांगून माजी महिला कर्मचाऱ्याकडून सुमारे ३४ लाख रुपयांचे कर्ज घेणे आणि ते परत न करण्यासाठी चक्क युनायटेड किंगडम (UK) मधील एका लॉ फर्मचे बनावट इनव्हॉइस (बिल) तयार केल्याप्रप्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध (CEO) मुंबईत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

माजी महिला कर्मचाऱ्याची आर्थिक फसवणूक: कालाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी डॉ. नीरज रमेश शेथ (संस्थापक आणि सीईओ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने यासंदर्भात अधिकृत तक्रार दिली आहे. पीडित महिला २०१७ मध्ये या स्टार्टअप कंपनीत सेल्स विभागात मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कार्यरत होती. त्यादरम्यान तिची डॉ. नीरज शेथ यांच्याशी चांगली मैत्री झाली. ऑक्टोबर २०१७ मध्ये पगार वेळेवर न मिळाल्याने तिने नोकरी सोडली, मात्र त्यांची मैत्री कायम होती.

मदतीचा गैरफायदा आणि बनावट कागदपत्रे: २०१८ मध्ये कंपनी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत नीरज शेथ यांनी पीडित महिलेकडे आर्थिक मदतीची मागणी केली. विश्वास ठेवून महिलेने २०१८ ते २०२२ या कालावधीत रोख रक्कम, बँक खात्यांद्वारे ट्रान्सफर आणि स्वतःच्या क्रेडिट कार्डचा वापर करून एकूण ५०.२५ लाख रुपयांचे ‘फ्रेंडली लोन’ (कर्ज) दिले. यापैकी शेथ यांनी केवळ १६.३१ लाख रुपये परत केले, तर उर्वरित ३३.९४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. २०१४ मध्ये जेव्हा महिलेने मुलुंड पोलिसांत दुसऱ्या एका प्रकरणात चौकशी केली, तेव्हा हा गैरप्रकार समोर आला. आरोपीने दायित्वापासून वाचण्यासाठी यूकेच्या एका नामांकित लॉ फर्मचे बनावट दस्तऐवज सादर केले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करणे (गुन्हेगारी कट) या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, गुगल शीट (E-documents) आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *