
पुणे/भीमाशंकर (pragatbharat.com) : मुंबईत ‘मातोश्री’वर सुरू असलेल्या बैठकीच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या वावटळीदरम्यान, पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर (Bhima Shankar) मंदिराच्या नव्या सभामंडप पूजेसाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या एका सूचक विधानाने संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय,” असा मिश्कील आणि राजकीयदृष्ट्या गर्भित खुलासा केला आहे.
नेमका काय घडला प्रकार? भीमाशंकर मंदिराच्या नव्या सभामंडपावरील मुकुटाची आणि दीपमाळेची विधिवत पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने खेड विधानसभेचे ठाकरे गटाचे एकमेव आमदार बाबाजी काळे (Babaji Kale) हेदेखील उपस्थित होते. पूजा संपन्न झाल्यानंतर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत एकत्रित छायाचित्र (Photo) काढण्याचा आग्रह धरला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास मिश्कील शैलीत, “फोटोची काय गरज आहे… बाबाजींना आम्ही आधीच एक प्रपोजल (प्रस्ताव) दिलं आहे,” असे गुपित जाहीर केले. फडणवीस यांनी हे प्रपोजल नेमके कशाचे आहे, यावर पुढे बोलणे टाळले असले, तरी ठाकरे गटाचा पुण्याचा एकमेव गडही महायुतीच्या गळाला लागणार का? या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
१५ जूनपासून भीमाशंकर मंदिरात मर्यादित दर्शन: या सोहळ्यानंतर प्रशासनाने भाविकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांसाठी बंद असलेले भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून भाविकांसाठी मर्यादित स्वरूपात खुले करण्यात येत आहे. भाविकांना दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेतच आणि मर्यादित संख्येने मंदिरात प्रवेश दिला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या भीमाशंकर दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गोपनीयता बाळगली होती, अगदी प्रसारमाध्यमांनाही (Media) मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता.


