इस्रो आणि अणुऊर्जा विभागाची मोठी युती! चंद्रावरील उणे १२९ अंशांच्या थंडीत २०० दिवस टिकणारे नवे लँडर होणार तयार

बेंगळुरू (pragatbharat.com) : भारताच्या अंतराळ मोहिमांना अधिक दीर्घायुष्य आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चंद्रावरील अत्यंत प्रतिकूल आणि गोठवून टाकणाऱ्या वातावरणातही भारताचे लँडर सुरक्षित राहावे, यासाठी इस्रोने केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागाशी (Department of Atomic Energy – DAE) महत्त्वपूर्ण हातमिळवणी केली आहे. या दोन्ही संस्था मिळून आता चंद्रावरील गोठवणाऱ्या थंडीपासून संरक्षण करणारी अत्याधुनिक ‘कृत्रिम उष्णता प्रणाली’ (Advanced Artificial Heating System) विकसित करणार आहेत.

१४ दिवसांऐवजी आता चंद्रावर २०० दिवस टिकणार लँडर: बेंगळुरू येथे आयोजित ‘CSIR-RISE कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. ते म्हणाले, “भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान-३ मोहिमेतील ‘विक्रम लँडर’ हे सौरऊर्जेवर (Solar Energy) चालत असल्याने ते चंद्रावर केवळ १४ दिवसच (एक चांद्र दिवस) कार्यरत राहू शकले. चंद्रावरील रात्र ही पृथ्वीच्या १४ दिवसांएवढी मोठी असते, ज्या दरम्यान तापमान उणे १२९ अंश सेल्सिअस (-129°C) पर्यंत खाली घसरते. या हाडे गोठवणाऱ्या थंडीत बॅटऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होतात. मात्र, आता अणुऊर्जेवर आधारित कृत्रिम हीटर्सचा वापर करून आम्ही असे लँडर विकसित करत आहोत, जे चंद्रावरील या अत्यंत भीषण हवामानात तब्बल २०0 दिवसांपर्यंत जिवंत आणि कार्यरत राहू शकेल.” या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील प्रदीर्घ चांद्र मोहिमांना मोठी मदत होणार आहे.

गगनयान आणि इतर संस्थांशी महत्त्वाचे करार: इस्रो प्रमुखांनी अंतराळ क्षेत्रातील इतरही मोठ्या भागीदारींचा खुलासा केला. इस्रो आणि ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद’ (CSIR) यांनी तंत्रज्ञान सहकार्यासाठी ४० क्षेत्रे निश्चित केली असून, त्यापैकी १७ क्षेत्रांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, ‘गगनयान’ (Gaganyaan) या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘स्पेस मेडिसिन्स’ (अंतराळ औषधे) विकसित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच खासगी क्षेत्रासोबत भागीदारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) ‘ॲक्सिअम-४’ (Axiom 4) मोहिमेदरम्यान ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेल्या ‘मायक्रोग्रॅव्हिटी’ प्रयोगांसाठी इस्रोने जैवतंत्रज्ञान विभागासोबत (DBT) देखील यशस्वी काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *