हिंमत असेल तर मुंब्र्यात पांढऱ्या पट्ट्या मारून दाखवा; मनसे नेते संदीप देशपांडेंचे जैन मुनींना थेट आव्हान; राजकीय वातावरण तापले

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील घाटकोपर, दादर आणि चर्नी रोड परिसरात जैन धर्मीयांकडून रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून आता मनसे आणि जैन धर्मगुरूंमध्ये जाहीर वाद पेटला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन धर्मगुरू नीलेशचंद्र महाराज यांच्या विधानाचा तीव्र समाचार घेत, “जर तुमच्यात हिंमत असेल तर मुंब्र्यात जाऊन पांढऱ्या पट्ट्या मारून दाखवा,” असे थेट आव्हान दिले आहे. या वादाने आता मुंबईत ‘सांस्कृतिक दहशतवादा’चा मुद्दा ऐरणीवर आणला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

वादाची पार्श्वभूमी आणि पालिकेची कारवाई: काही दिवसांपूर्वी जैन धर्मीयांच्या चातुर्मास किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाबाहेर आणि इतर सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. या सार्वजनिक रस्ते विद्रुतीकरणाला मनसेने तीव्र विरोध केला. वाद वाढल्याचे पाहून मुंबई महानगरपालिकेने (BMC) मध्यस्थी करत या पट्ट्या हटवल्या आणि स्पष्ट केले की, अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यांवर पट्ट्या मारण्याची कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती.

जैन धर्मगुरूंचे ‘मुंब्रा’ विधान आणि मनसेचा पलटवार: या कारवाईनंतर जैन धर्मगुरू नीलेशचंद्र महाराज यांनी मनसेला डिवचत, “आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. मनसेने हिंमत असेल तर मुंब्र्यात (मुस्लिम बहुल परिसर) जाऊन आंदोलन करावे,” असे विधान केले होते. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत घणाघाती पलटवार केला. देशपांडे म्हणाले, “बांगड्या भरल्या नाहीत असे म्हणणाऱ्यांची महिलांबद्दलची मानसिकता यातून दिसून येते. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या वीर महिलांचा इतिहास आहे.”

“हा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही” संदीप देशपांडे यांनी या प्रक्रियेला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ असे संबोधले. ते म्हणाले, “मी मासे खात नाही म्हणून माझ्या घरासमोर मच्छी मार्केट नको, ही भूमिका म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद आहे. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालून अस्वच्छता करणे हाही एक प्रकारचा त्रास आहे. भोंग्यांच्या विरोधात मनसेने जसे आंदोलन केले, तीच भूमिका आमची या पांढऱ्या पट्ट्यांबाबत आहे. जेव्हा भोंग्यांचे आंदोलन सुरू होते, तेव्हा हे मुनी घरी शेपट्या घालून बसले होते. रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता (Public Property) आहे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका, जिथे असे प्रकार घडतील तिथे मनसैनिक पोहोचतील,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *