
पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. राज्याच्या काही भागांत तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशाच्या पुढे गेला असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. अमरावती आणि हिंगोली जिल्ह्यांत झालेल्या या अवकाळी संकटामुळे संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अमरावतीत गारपीट, संत्रा पिकाचे अतोनात नुकसान: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात आज दुपारी अचानक ढगाळ वातावरण होऊन मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावेळी अनेक गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला असला, तरी संत्रा आणि मोसंबीच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेली फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून परिसरात मोठी धावपळ उडाली.
हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस; केळीच्या बागा जमीनदोस्त: दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषतः वसमत तालुक्यातील बागल पार्डी, सोमठाणा, गिरगाव दाभाडी, पेडगाव आणि सालापूर शिवारातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. वर्षभर लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या बागा हाती येण्याच्या अंतिम टप्प्यातच नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट; आयएमडीचा सुधारित अंदाज: या चालू वर्षातील मान्सूनच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने (IMD) एक चिंताजनक सुधारित अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या मते, यंदा मान्सूनवर ‘एल निनो’चा (El Nino) मोठा प्रभाव राहणार आहे.
- पावसाच्या प्रमाणात घट: यापूर्वी एप्रिल महिन्यात देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज होता, मात्र आता तो घटवून ९० टक्के करण्यात आला आहे.
- सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रभाव: ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी असेल. जुलै-ऑगस्टमध्ये तो सर्वसाधारण तर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक असेल, ज्याचा थेट विपरीत परिणाम महाराष्ट्रातील मान्सूनवर होऊन पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.



