
नवी दिल्ली (pragatbharat.com) : जागतिक स्तरावर वाढता तणाव आणि परकीय चलन साठ्यावरील (Foreign Exchange Reserve) ताण लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आगामी एक वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवण्याचे आणि इंधनाचा वापर कमी करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या विधानामुळे सराफा बाजार आणि उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली असून, याचे पडसाद देशभर उमटत आहेत.
मध्य पूर्वेतील इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०४ डॉलरच्या पार गेले आहेत. यामुळे भारताला इंधन आणि सोने आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. रुपयाची स्थिती मजबूत राखण्यासाठी आणि डॉलरची बचत करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना लग्नसमारंभासाठी सोन्याची खरेदी टाळणे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देणे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मात्र, ‘ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’ने (GJC) यावर चिंता व्यक्त केली आहे. जर सोने खरेदी पूर्णपणे ठप्प झाली, तर देशातील सुमारे १ कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो आणि ज्वेलरी उद्योगाची उलाढाल ३ लाख कोटी रुपयांनी घटू शकते, असा दावा जीजेसीने केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज ‘पीएमओ’मधील अधिकार्यांची भेट घेणार आहेत.

