Vaibhav Sooryavanshi Fastest Fifty Record: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! ११ चेंडूंत ठोकले अर्धशतक; श्रीलंका ‘A’ चा धुव्वा उडवत भारत ‘A’ बनला चॅम्पियन

कोलंबो (pragatbharat.com) : भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर आणखी एक अद्भूत आणि दैदिप्यमान हिरा चमकला आहे. त्रिकोणीय मालिकेच्या (Tri-Series Final) अंतिम सामन्यात १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने आपल्या वादळी फलंदाजीने जागतिक क्रिकेटला हादरवून सोडले आहे. वैभवने अवघ्या २९ चेंडूंत ९४ धावांची स्फोटक खेळी करत भारत ‘अ’ (India ‘A’) संघाला श्रीलंका ‘अ’ (Sri Lanka ‘A’) संघाविरुद्ध ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या ऐतिहासिक खेळीसह भारत ‘अ’ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

२१ वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला; ११ चेंडूंत ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक बिहारच्या समस्तीपूर येथील अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने मैदानात उतरताच श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसें काढली. त्याने केवळ ११ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने लिस्ट-ए (List A Cricket) क्रिकेटच्या इतिहासातील जागतिक स्तरावरील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. वैभवने २००५ मधील श्रीलंकेच्या कौशल्या वीराटने याचा १२ चेंडूंत अर्धशतक बनवण्याचा २१ वर्षांचा जुना जागतिक विक्रम मोडीत काढला. वैभवच्या पहिल्या ११ चेंडूंचा प्रवास ४, ४, ४, ६, ६, ०, ६, ४, ४, ६, ६ असा राहिला; ज्यात त्याने ५ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले.

भारताचा विशाल धावसंख्या उभारून श्रीलंकेवर हल्ला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने वैभवच्या ९४ धावा आणि प्रियांश आर्यच्या (३९ धावा) जोरावर पहिल्या विकेटसाठी अवघ्या ९ व्या ओव्हरमध्ये १३२ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा (६७ धावा), ऋतुराज गायकवाड (४० धावा), अनुकूल रॉय (३९ धावा) आणि विप्रज निगम (२७ धावा) यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे भारताने ९ बाद ३७७ धावांचा अवाढव्य डोंगर उभा केला.

श्रीलंकेचा डाव ३११ धावांवर गुंडाळला ३७८ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना यजमान श्रीलंका ‘अ’ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे वेगवान गोलंदाज यश ठाकूर (३/४५) आणि फिरकीपटू विप्रज निगम (३/६०) यांनी सुरुवातीच्या १० ओव्हरमध्येच श्रीलंकेचे अव्वल तीन फलंदाज डिकवेला, अविष्का फर्नांडो आणि नुवानिदु फर्नांडो यांना केवळ ७५ धावांवर तंबूत पाठवले. श्रीलंकेकडून वनुज सहन (६२ धावा) आणि सदिरा समरविक्रमा (५२ धावा) यांनी अर्धशतके झळकावून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिओव्हर ८ पेक्षा जास्त धावगती राखण्याच्या दबावामुळे त्यांचा संपूर्ण संघ ३११ धावांवर ऑलआऊट झाला. या दिमाखदार विजयामुळे भारतीय युवा क्रिकेटपटूंच्या धैर्याचे आणि विशेषतः वैभव सूर्यवंशीच्या अद्भूत प्रतिभेचे जगभरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *