अखेर तोडगा निघाला! मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश; ‘या’ अटीवर आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे

पंढरपूर (pragatbharat.com) : गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटीविरोधात सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा अखेर यशस्वी सुखांत झाला आहे. राज्याचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जात रोहित पवार यांची भेट घेतली आणि सकारात्मक मध्यस्थी केली. चर्चा सुरू असतानाच गिरीश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून संवाद घडवून आणला. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर आणि २२ जूनपूर्वी मुंबईत विशेष बैठक घेण्याच्या अटीवर रोहित पवार यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

२२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत होणार निर्णायक बैठक: आंदोलन मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार म्हणाले, “२२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी सरकार या विषयावर सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. राज्यामध्ये ३० जूनपासून कर्जमाफी लागू होणार आहे, त्यामुळे त्यापूर्वीच जीआरमधील जाचक अटींमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. आम्ही केवळ दोन छोट्या अटी मांडल्या आहेत, सरकारने त्या मान्य कराव्यात. जर या बैठकीत तोडगा निघाला नाही किंवा काही गडबड झाली, तर आगामी ४ जुलै रोजी मराठवाड्यात यापेक्षा तीव्र आंदोलन उभे केले जाईल.”

सर्व शेतकरी नेते चर्चेला जाणार: मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीला केवळ रोहित पवारच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. तसेच, रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखलही सरकारने तातडीने घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सकारात्मक – गिरीश महाजन: यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येतो, म्हणूनच सरकार त्यांना कर्जमाफी आणि पाण्याचा प्रश्न सोडवून आर्थिक बळ देत आहे. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाली असून, चर्चेतून नक्कीच सुवर्णमध्य निघेल.” या यशस्वी मध्यस्थीमुळे गेल्या तीन दिवसांपासून पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला चिंतेचा वातावरण आता निवळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *