
आळंदी (pragatbharat.com) : श्री क्षेत्र आळंदी येथील हराळे वैष्णव धर्मशाळा येथे दर ३ वर्षांनी अधिक मास महिन्यात येणाऱ्या ‘कमला एकादशी’ निमित्त मुळशी तालुक्यातील कासारसाई आणि लवळे येथील थोरवे आणि कांबळे परिवारातर्फे भव्य अन्नदान आणि बारशीचा (द्वादशी) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मागील २५ वर्षांपासून सुरू असलेली ही अखंड धार्मिक परंपरा यावर्षीही दोन्ही परिवारांनी मोठ्या भक्तीभावाने जपली.
११ जून रोजी महाप्रसादाचे वाटप
दिनांक ११ जून २०२६ रोजी, एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आळंदीत जमलेल्या भाविकांसाठी फराळाचे आणि भोजनाचे विशेष नियोजन करण्यात आले होते. उपवास असलेल्या भाविकांसाठी खास साबुदाणा खिचडीची सोय करण्यात आली होती. तर इतर सर्व भाविकांसाठी स्वादिष्ट मसाले भात व शिरा असा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
५०० हून अधिक भाविकांना अन्नदान

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ जून रोजी सकाळी बारशीचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. या दोन्ही परिवारांतर्फे सुमारे ५०० हून अधिक लोकांसाठी महाप्रसादाचे आणि अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात बारस सोडण्याचा कार्यक्रम पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी गाडेकर पुजारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
एकजुटीतून आणि लोकवर्गणीतून आयोजन

या भक्तिमय सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी अंबर थोरवे, मच्छिंद्र थोरवे, सुभाष थोरवे, ईश्वर थोरवे, विशाल थोरवे, तुकाराम थोरवे तसेच ज्ञानेश्वर कांबळे, गणेश कांबळे, महेश कांबळे व राजू कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या अन्नदान आणि बारशीच्या कार्यक्रमासाठी लागणारा सर्व खर्च थोरवे आणि कांबळे परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे विभागून गोळा केला. तसेच काही भाविकांनी उत्स्फूर्तपणे देणगी दिली, या सर्व देणगीदारांचे संयोजकांतर्फे विशेष आभार मानण्यात आले.
भविष्यात म्हणजेच पुढील ३ वर्षांनी येणाऱ्या अधिक मास एकादशीला हा सोहळा आणखी भव्य आणि चांगल्या स्वरूपात कसा करता येईल, यावरही सर्व सदस्यांनी यावेळी सकारात्मक चर्चा केली.



