
नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारतीय क्रीडा क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेते आणि भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतीय संघासोबत म्युनिकहून मायदेशात परतत असतानाच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रीडा विश्वावर तीव्र शोककळा पसरली आहे.
म्युनिकहून परतताना बिघडली प्रकृती: मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह उत्कृष्ट कामगिरी केली होती. या ऐतिहासिक यशानंतर जसपाल राणा भारतात परतत होते. मात्र, म्युनिकहून दिल्ली प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दिल्ली विमानतळावर उतरताच त्यांना तातडीने साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले आणि शुक्रवार, १२ जून रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
मनू भाकरसह अनेक स्टार नेमबाजांचे मार्गदर्शक: जसपाल राणा यांनी २०१२ पासून ज्युनियर पिस्तूल प्रशिक्षक म्हणून काम करताना सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या अनेक जागतिक दर्जाच्या नेमबाजांना घडवले. विशेष म्हणजे, भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिचे ते वैयक्तिक मार्गदर्शक होते. त्यांच्याच कठोर प्रशिक्षणाच्या बळावर मनू भाकरने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (NRAI) त्यांची २५ मीटर पिस्तूल प्रकारासाठी ‘उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक’ (High-Performance Coach) म्हणून नियुक्ती केली होती. क्रीडा क्षेत्रातील या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना प्रतिष्ठित ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’ने सन्मानित केले होते.
शानदार कारकीर्द आणि संरक्षणमंत्र्यांकडून शोक व्यक्त: जसपाल राणा यांनी खेळाडू म्हणून भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ८ पदके जिंकली होती. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी १९९४ च्या हिरोशिमा आशियाई गेममध्ये २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या निधनावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “जसपाल राणा हे एक उत्कृष्ट खेळाडू, महान प्रशिक्षक आणि अत्यंत साधे व्यक्ती होते. भारतात नेमबाजी खेळ लोकप्रिय करण्यात त्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही,” अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


