‘ती परत येतेय…’; मालिका बंद झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, रोहित पवार-आव्हाडांची आर्थिक मदत

मुंबई (pragatbharat.com) : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये अचानक बंद करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या मालिकेचा शेवटचा भाग १४ जून रोजी प्रसारित झाला. मात्र, मालिका बंद झाली तरी इतिहास थांबणार नाही, असा निर्धार करणारे अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. ‘सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका लवकरच एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस परत येत आहे.

मालिकेला राजकीय नेत्यांचे आर्थिक पाठबळ: नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात अमोल कोल्हे यांनी महापुरुषांच्या विचारांवर आधारित मालिका कशाप्रकारे टीआरपी आणि इतर कारणांमुळे बंद पाडल्या जातात, याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आमदार रोहित पवार यांनी ५० लाख रुपये तर ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत या मालिकेच्या पुढील प्रवासासाठी जाहीर केली आहे.

वैचारिक बैठक मजबूत करण्याचा निर्धार: अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “ती परत येतेय…” असे म्हणत नव्या मालिकेची घोषणा केली आहे. यापूर्वी बोलताना त्यांनी स्पष्ट केले होते की, “पैसा कसा उभा राहील हे मला माहीत नाही, पण महाराष्ट्राची वैचारिक बैठक मजबूत ठेवण्यासाठी या महापुरुषांचा इतिहास घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील.” कोल्हे यांनी १४ जूनला मालिका बंद होताच, त्याच आठवड्यात नव्या प्रवासाची घोषणा करण्याचा शब्द दिला होता, जो त्यांनी पाळला आहे.

दरम्यान, ही मालिका आता कोणत्या वाहिनीवर किंवा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आणि यामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील, याविषयीचा सविस्तर तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *