देशाचा अमूल्य हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ अभियानात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी, चिंचवड (pragatbharat.com) : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय अभियानांतर्गत देशातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानात शहरातील ग्रंथालये, संग्रहालये, शैक्षणिक संस्था, मठ, संशोधक तसेच खाजगी संग्राहकांनी सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध हस्तलिखितांची माहिती महानगरपालिकेकडे सादर करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘ज्ञानभारतम्’ ही योजना केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आली असून भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन हा तिचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार पपायरस, चर्मपत्र, भूर्जपत्र, ताडपत्र, कागद किंवा तत्सम साधनांवर हाताने लिहिलेला मजकूर म्हणजे हस्तलिखित होय. यामध्ये विविध ग्रंथ, पुस्तके, संशोधनात्मक लेखन आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा समावेश होतो.
या अभियानांतर्गत साधारणतः ७५ वर्षांपूर्वीची किंवा त्यापूर्वीची हस्तलिखिते नोंदविणे अपेक्षित आहे. शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने देशभरातील एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध, नोंदणी आणि डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखित वारशाचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांच्याकडेच कायम राहणार आहे. मात्र, इच्छुक व्यक्ती अथवा संस्था स्वेच्छेने हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करू इच्छित असल्यास शासन त्यांचा स्वीकार करणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, पुणे यांच्या निर्देशानुसार या अभियानाची महानगरपालिका स्तरावर प्रभावी अंमलबजावणी, समन्वय आणि आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यानुसार शहरातील सर्व सार्वजनिक व खाजगी ग्रंथालये, संग्रहालये, संशोधक, शाळा, महाविद्यालये, मठ तसेच खाजगी संग्राहक यांनी त्यांच्या ताब्यातील सुमारे ७५ वर्षांपूर्वीची किंवा त्यापूर्वीची हस्तलिखिते यांची माहिती ‘ज्ञानभारतम् या मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उपलब्ध हस्तलिखितांबाबतची माहिती मोबाईल/व्हॉट्सअॅप क्रमांक ८३८०८१७८०६ किंवा library@pcmcindia.gov.in या ई-मेलवर महानगरपालिकेला कळवावी.

भारतीय संस्कृती, इतिहास आणि ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असून नागरिक, संस्था आणि संग्राहक यांच्या सहकार्यामुळे राष्ट्राचा अमूल्य सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

कोट
भारताची ओळख केवळ भौतिक विकासातून नव्हे तर त्याच्या समृद्ध ज्ञानसंपदा आणि सांस्कृतिक परंपरेतूनही जगासमोर निर्माण झाली आहे. अनेक मौल्यवान हस्तलिखितांमध्ये आपल्या पूर्वजांचे ज्ञान, संशोधन, साहित्य आणि इतिहास जतन झालेले आहे. ‘ज्ञानभारतम्’ अभियानाच्या माध्यमातून या अमूल्य ठेव्याचे जतन आणि डिजिटायझेशन होणार आहे. शहरातील सर्व संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संशोधक आणि नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी योगदान द्यावे.

  • रवि लांडगे. महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोट
भारताची ज्ञानपरंपरा, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक दुर्मिळ हस्तलिखितांमध्ये आपल्या समाजाचे वैचारिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभव दडलेले आहे. ही अमूल्य संपदा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ग्रंथालये, शैक्षणिक संस्था, संशोधक, मठ आणि खाजगी संग्राहकांनी त्यांच्या ताब्यातील जुनी हस्तलिखिते शोधून त्यांची माहिती महानगरपालिकेला उपलब्ध करून द्यावी. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून राष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाला निश्चितच बळ मिळेल.

  • डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *