
नवी मुंबई (pragatbharat.com) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) एका अधिकृत कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पालिकेच्या विविध आरोग्य विषयक सुविधांच्या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेतून थेट राज्याचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. कार्यक्रम स्थळी एका बाजूला आतमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन सुरू असताना, बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
“तिसऱ्यांदा असं झालं तर पालिकेला टाळं ठोकणार” – विजय माने: हा वाद समोर आल्यानंतर शिवसेना नेते विजय माने यांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील आणि देशातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी आणला आहे. असे असतानाही केवळ राजकारणापोटी त्यांना डावलण्यात आले आहे. ही अशी दुसरी वेळ असून, तिसऱ्यांदा जर असा प्रकार घडला तर नवी मुंबई महानगरपालिकेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही.” तसेच, “गणेश नाईक यांचा हा मतदारसंघ (हा मंदा म्हात्रे यांचा मतदारसंघ आहे) नसतानाही त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. आज एकनाथ शिंदे नसते, तर नाईक साहेब लाल दिव्याच्या गाडीतून फिरू शकले असते का?” असा थेट सवालही विजय माने यांनी उपस्थित केला.
गणेश नाईक यांचे उत्तर; चेंडू आयुक्तांच्या कोर्टात: या निमंत्रण पत्रिकेवर आमदार व वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची नावे छापण्यात आली आहेत, परंतु मुख्य नेत्याचे नाव गायब आहे. या उद्भवलेल्या वादावर आणि शिवसैनिकांच्या आंदोलनावर जेव्हा वनमंत्री गणेश नाईक यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सावध पवित्रा घेतला. “पत्रिकेवर नाव का नाही, याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. या संदर्भात आपण महापालिका आयुक्तांनाच जाब विचारावा,” असे उत्तर देत गणेश नाईक यांनी या वादातून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रोटोकॉलच्या वादामुळे महायुतीमधील स्थानिक अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.


