
नवी दिल्ली (pragatbharat.com) : ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधत देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन (VP C P Radhakrishnan) यांनी समस्त देशवासीयांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. “निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात,” असे सांगत उपराष्ट्रपतींनी देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घराभोवती किंवा कोणत्याही योग्य ठिकाणी किमान एक झाड लावण्याचे (Plant Atleast One Tree) आग्रही आवाहन केले आहे.
कोट्यवधी झाडांची होईल निर्मिती – उपराष्ट्रपती: आपल्या एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपराष्ट्रपतींनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “झाडे ही केवळ हवामान स्वच्छ ठेवत नाहीत, तर वेळेवर पाऊस आणणे, हवेची गुणवत्ता सुधारणे, वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.” जर भारताच्या प्रत्येक नागरिकाने केवळ एक झाड लावण्याची जबाबदारी घेतली, तर या सामूहिक प्रयत्नातून देशात एकाच वेळी कोट्यवधी झाडे लावली जातील. हा उपक्रम स्वच्छ आणि हरित भारताच्या (Cleaner & Greener India) निर्मितीसाठी एक ऐतिहासिक योगदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ (Ek Ped Maa Ke Naam) या देशव्यापी मोहिमेचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी सर्व नागरिकांना, तरुणांना आणि संस्थांना या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ही मोहीम केवळ सरकारी कार्यक्रम न राहता एक लोकचळवळ बनावी, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपण एक सुरक्षित आणि सुंदर निसर्ग देऊ शकू, असेही त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले.


