
मुंबई/जळगाव (pragatbharat.com) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील (Jalgaon Legislative Council Election) शिवसेना शिंदे गटाची बंडखोरी अखेर पूर्णपणे शमली आहे. गेल्या २४ तासांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या बंडखोर उमेदवार तथा नगरसेविका रेश्मा काळे (Reshma Kale) यांनी थेट मुंबई गाठून पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर रेश्मा काळे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधातील आपली अपक्ष उमेदवारी मागे घेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
महिला पदाधिकाऱ्यांसह वर्षा निवासस्थानी बैठक आणि तोडगा: जळगावची जागा महायुतीत भाजपला सुटली असून भाजपने संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय असलेल्या नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष अर्ज भरून बंडाचे निशाण फडकवल्याने महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पातळीवर नेत्यांनी मनधरणी करूनही त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या आणि कालपासून ‘नॉट रिचेबल’ होत्या. अखेर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी यांच्यासह रेश्मा काळे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना महायुती धर्म पाळण्याचा आणि पक्षासोबत राहण्याचा कडक सल्ला दिला.
‘आजपासून प्रचार थांबवला’; स्थानिक पातळीवर उद्या औपचारिक घोषणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आणि त्यांच्या आदेशानंतर रेश्मा काळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन करत मी आजपासूनच माझा निवडणूक प्रचार थांबवत असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा देत आहे,” असे काळे यांनी जाहीर केले. या यशस्वी मध्यस्थीनंतर जळगावमधील बंडखोरी अधिकृतपणे संपुष्टात आली असून, उद्या जळगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांच्या माघारीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वादावर पडदा पडला आहे.


